Saturday, October 2, 2010

पाचगणी, महाबळेश्वरपाठोपाठ आता ‘कास’ पठार संकटात!

वैशिष्टय़पूर्ण वनस्पती जगातून कायमच्या नामशेष होण्याचा धोका
अभिजित घोरपडे ,पुणे, २८ सप्टेंबर

पाचगणी आणि महाबळेश्वर पठारांवरील अनेक दुर्मिळ वनस्पती गेल्या वीस वर्षांत अर्निबध पर्यटनामुळे कायमच्या नामशेष झाल्यानंतर आता हेच लोण कास पठारापर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जगात केवळ कास पठारावरच आढळणाऱ्या चार प्रकारच्या वनस्पती, तसेच इतरही अतिशय दुर्मिळ वनस्पती आणि पठारांवरील अनोख्या जैवविविधतेच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कासच्या वैशिष्टय़पूर्ण पुष्पपठाराला गेल्या काही वर्षांत अनेक धोक्यांचा सामना करावा लागत आहे. पर्यटकांची वाढती गर्दी, वाहनांची वर्दळ, बेशिस्तीमुळे किंवा अजाणतेपणे वनस्पतींचे होणारे नुकसान, तसेच कुतूहलापोटी उपटल्या जाणाऱ्या वनस्पती अशा अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. हे पठार नैसर्गिकदृष्टय़ा अतिशय संवेदनशील आहे. पावसाळय़ात केवळ काही आठवडय़ांचे आयुष्य लाभलेल्या या वनस्पती गेल्या काही वर्षांमध्ये पावसातील चढउताराचा आणि अनियमित वेळापत्रकाचा परिणाम झेलत आहेत. त्यातच आता पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी, वाहनांची वर्दळ, त्यांची बेशिस्त आणि ‘विकासा’च्या नावाखाली होऊ घातलेल्या बदलांमुळे तेथील वनस्पतींवर नवे संकट येऊन ठेपले आहे.
वनस्पतितज्ज्ञ आणि सहय़ाद्रीतील वनस्पतिजगताचे गाढे अभ्यासक डॉ. मधुकर बाचुलकर, तसेच ‘क्रिएटिव्ह नेचर्स फ्रेंड्स’चे रोहन भाटे यांच्याशी चर्चा केली असता कास पठारावरील पुष्पसंपदेला असलेला धोका प्रकर्षांने जाणवला. महाराष्ट्रातील अनेक पठारांवरील वनस्पतिसंपदा अर्निबध वर्दळीमुळे नष्ट झाली आहे. पाचगणीचे विस्तीर्ण पठार अर्थात ‘टेबल लॅन्ड’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या पठारावर व आसपासच्या परिसरात गेल्या ३० ते ४० वर्षांमध्ये वनस्पतींच्या १२ नव्या प्रजाती आढळल्या. त्यात सिरोपिया नूरजहानी, सिरोपिया पंचगनांसिस, क्रायनम वूडरी अशा वैशिष्टय़पूर्ण पुष्पवनस्पतींचा समावेश होता. पण गेल्या दोन दशकांमध्ये परिस्थिती इतकी बदलली आहे, की आता या जाती तिथे नावालासुद्धा पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे या जाती वनस्पतिजगतातून कायमच्या नष्ट झाल्या असल्याचेच चित्र आहे. हे घडण्यास अर्निबध व बेशिस्त पर्यटक हेच प्रमुख कारण ठरले आहे. हेच महाबळेश्वर येथेही पाहायला मिळाले आहे. शंभर वर्षांपूर्वी महाबळेश्वरच्या पठारांवर मुबलक आढळणारी ‘क्रायमन ब्रॅचिनिमा’ ही रानलीलीची जात अशाच कारणांमुळे नष्ट झाली. आता संपूर्ण परिसरात शोधूनही सापडत नाही. पाचगणी आणि महाबळेश्वर येथे न घेतलेली काळजी कास पठाराच्या बाबतीतही घेतली गेली नाही तर तिथेसुद्धा हाच धोका संभवतो. कासच्या पठाराचे वैशिष्टय़ म्हणजे तिथे आढळणाऱ्या वनस्पतींच्या ६० ते ७० प्रजाती स्थानिक व दुर्मिळ आहेत. त्यातल्या चार प्रजाती तर कासच्या पठाराशिवाय जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. त्यात अ‍ॅपानोगेटन सातारेन्सिस (वायतुरा), अरिसेमा सहय़ाद्रीकम घाटीकम (छोटा सापकांदा), युलालिया श्रीरंगी व मेन्सेथिया वलदकम्पी (गवताच्या प्रजाती) यांचा समावेश आहे. त्यामुळेच कासचेसुद्धा पाचगणी किंवा महाबळेश्वर झाले तर यासारख्या वैशिष्टय़पूर्ण प्रजाती जगातून कायमच्या नष्ट होण्याचा धोका आहे. म्हणूनच कास पठारासाठी तातडीने संरक्षण व संवर्धन महत्त्वाचे ठरले आहे. तोपर्यंत शिस्तबद्ध, मर्यादित व पर्यावरणपूरक पर्यटन राबविण्याची आवश्यकता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. 

निसर्गातील बदलांचेही संकट
कासच्या पठाराला निसर्गातील बदलांचे संकट आधीच भेडसावत असल्याने आता मानवनिर्मित समस्यांच्या विळख्याची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवण्याचा धोका आहे. पठारावरील या पुष्पवनस्पतींचे आयुष्य पावसाळय़ात केवळ काही आठवडय़ांइतकेच आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी-जास्त होणे, त्याचे उशिराने आगमन होणे आणि त्याने दिलेली उघडीप या गोष्टींचा त्यांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होतो. या वनस्पती पावसाळा संपताना मरून जातात तेव्हा त्यांच्या बिया पठारावरच पडतात. या बियांची दूर अंतरावर पसरण्याची क्षमताच नसल्याने त्या पठारापुरत्याच मर्यादित राहतात. त्यामुळेच एखाद्या वर्षी पावसाने मोठी उघडीप दिल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे या बिया रुजल्याच नाहीत, तर पुढच्या वर्षी त्या वनस्पती तिथे न उगवण्याचा धोका असतो. अलीकडच्या काळात पावसातील अनियमिततेचा धोका वाढल्यामुळे कासच्या पुष्पपठाराला निसर्गातील बदलांचे संकट सहन करावे लागत आहे, असे निरीक्षण डॉ. बाचुलकर यांनी नोंदवले आहे. या परिस्थितीत आता मानवामुळे उभे राहिलेले संकट सहन करणे या कास पठारासाठी अधिकच खडतर ठरणार आहे.

Story

Sahyadris: India's Western Ghats - A Vanishing Heritage
Flowers of Sahyadri Field Guide to 500 Flowers of North Western-ghats of India
Trek the Sahyadris
Flowers of Sahyadri Field Guide to 500 Flowers of North Western-ghats of India

No comments:

Post a Comment