Wednesday, May 2, 2012

तुझी माझी प्रीत जगावेगळी!


तट्टेकाडच्या जंगलाइतके पक्ष्यांचे वैविध्य भारतात इतरत्र कुठेच नाही. पण आज या लावण्याच्या खाणीकडेही कंत्राटदार काकदृष्टीने बघताहेत. नऊ टक्‍क्‍यांनी पैसा फुगवत राहण्याच्या कैफात निसर्गसृष्टीची नासाडी होत आहे. हे शहाणपणाचे आहे का?

आपल्या सह्याद्रीवरचा बेडूकतोंड्या एक अफलातून पक्षी आहे. अगदी जगावेगळे प्रेम करणारा. पाखरांतल्या या येथील लैला-मजनूंची जोडी तासन्‌तास, दिवसन्‌दिवस, वर्षानुवर्षे एकमेकांना बिलगून असते, पंखाला पंख चिकटवून ! हा बेडूकतोंड्या भरपूर पावसाच्या प्रदेशात फोफावणाऱ्या सदाहरित अरण्याचा रहिवासी आहे. कोकण-मलबार अन्‌ पश्‍चिम घाटाचा मूलनिवासी. आज या साऱ्या मुलखातली वनराजी छिन्नविछिन्न झाली आहे. नैसर्गिक अरण्याच्या जागी रबराचे मळे, नारळी-पोफळीची कुळागरे, भातखाचरे, निलगिरी-अकेशियाची कृत्रिम जंगले, उजाड माळराने, नाही तर इमारती आणि रस्ते यांचे जोरदार अतिक्रमण होत चाललेय. पण सुदैवाने कुठे ना कुठे घनदाट वनकाननाचे अवशेष टिकून आहेत. त्यातलेच एक आहे केरळच्या किनारपट्टीवरचे नदी-नाल्यांनी वेढलेले तट्टेकाड. जिकडे तिकडे ओढी-तळी आणि उत्तुंग वृक्षराजी. साहजिकच जीवसृष्टी बहरली आहे. रंगीबेरंगी मासे आणि फुलपाखरे, भली-थोरली जाळी विणणारे कोळी आणि पक्षीच पक्षी....


सह्याद्रीच्या वर्षावनातल्या बेडूकतोंड्यांची अतूट जोडी. (छायाचित्र : डॉ. ललिता विजयन)

ख्यातनाम पक्षितज्ज्ञ सलीम अली सांगायचे - एका सकाळी दुसरीकडे कुठेही इतक्‍या जातींचे पक्षी भेटत नाहीत. तू तट्टेकाडला जायलाच पाहिजे. नुकताच तो योग आला. सलीम अलींचे विद्यार्थी सुगतन तट्टेकाडला पक्षिशास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात. त्यांच्या सोबतीत दिवसभर मनमुराद भटकलो. बेडूकतोंड्यांच्या एकूण चाळीस जोड्या तट्टेकाडची खासियत आहेत. हे बेडूकतोंडे घुबडांसारखे रात्री पोटपूजेला बाहेर पडतात. मोठा "आ' वासून उडत उडत रातकिडे मटकावतात. पहाटे निवाऱ्याच्या जागी परततात. त्यांचे रंगरूपच असे आहे, की झाडांवरच्या पालवीत बेमालूम मिसळून जातात. अनेक प्राणी असे "कामुफ्लाज' करतात; पण बेडूकतोंड्यांची सर कोणालाच येणार नाही. म्हणूनच बेडूकतोंडे बिनधास्त असतात. त्यांच्या कितीही जवळ पोचलो तरी हूं की चूं करत नाहीत. पहाटेपासून अंधार पडेपर्यंत ठराविक जागी, जोडी-जोडीने, एकमेकांना चिकटून निवांत बसून राहातात.

सुगतन यांना इथल्या झाडून साऱ्या बेडूकतोंड्या जोड्या कुठे ठाण मांडतात ते ठाऊक आहे. म्हणाले, "चल, बघायला.' काट्याकुट्यातून अचूक वाट काढत ते एका झाडापाशी घेऊन गेले. सांगायला लागले, "ते बघ पक्षियुगुल.' मी चक्रावलो. "कुठे आहे? मला तर काही उमगत नाही.' मग डोळे फाडून पाहिल्यावर दिसली - अगदी नाकासमोर, तीन फुटांवर, गपचिप बसलेली बेडूकतोंडी जोडी. पाने मध्ये येत होती म्हणून ती जरा सारून पाहायला गेलो, तर पुन्हा गायब. सावकाश लक्षात आले, की अगदी नि:स्तब्ध, फक्त डोळे विस्फारून आमच्याकडे टक लावून बघताहेत. सुगतन म्हणाले, "गेली तीन वर्षे चार महिने ही जोडी अशीच याच जागी ठिय्या देऊन आहे.' दुसऱ्याही अनेक जोड्यांची हीच कथा. खरेच, अजब है मालिक तेरी दुनिया !

आज हे बेडूकतोंडे आणि त्यांची निवासस्थाने दुर्मिळ झाली आहेत. तट्टेकाड हे त्यांचे सर्वांत सरस वसतिस्थान आहे. पण आता या तट्टेकाडवरही कंत्राटदारांची वक्रदृष्टी वळली आहे, या जंगलातून एक भलामोठा टोल रस्ता बांधण्यासाठी. या नैसर्गिक लावण्याच्या खाणीची नासधूस करण्यासाठी. तट्टेकाडजवळच त्रिचूर शहर आहे. त्रिचूरजवळ नुकताच एक टोल रस्ता बांधला आहे. तो रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदाराला सरकारमान्य दराच्या तिप्पट खर्चाची मंजुरी दिली गेली. त्या आधारे तो अवाच्या सव्वा टोल आकारणार आहे. शिवाय केवळ गावाबाहेरच्या नाही, तर गावातल्या गावात फिरणाऱ्यांनाही टोल भरावा लागणार आहे. लोक संतापलेत. मी तट्टेकाडहून रात्री त्रिचूरला पोचलो. त्या मध्यरात्रीपासून टोल गोळा करणे सुरू होणार होते. मी दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा टोल बूथशी पोचलो, तर काय! सगळ्या काचा फुटलेल्या, सगळे बूथ रिकामे. रात्री मारामारी होऊन लोकांनी टोळभैरवांना हाकलले होते.

हा हिंसाचार निश्‍चितच असमर्थनीय आहे, निंद्य आहे. पण असा संघर्ष का उफाळतो, हेही समजावून घ्यायला हवे. आपल्याला असे महागडे प्रचंड रस्ते हवेच का? का केवळ पैशांच्या लोभाने ते आपल्यावर लादले जाताहेत? अशा रस्त्यांपायी तट्टेकाडसारखे दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेले सृष्टिसौंदर्याचे ठेवे उद्‌ध्वस्त करायलाच हवेत का? एकूण काय चालले आहे? नाही सौंदर्याची मोजणी - नाही संघर्षाची टोचणी - विकास म्हणजे निव्वळ पैशांचे पाणी पाणी आणि धनिकांची संपादणी ! वाटते, नऊ टक्के आर्थिक विकासाच्या नशेत आपण चिरस्थायी मानवी मूल्यांना मूठमाती देताहोत. एक वेळ बेडूकतोंड्यांसारखे गपचिप बसलो तर बसलो, निदान त्यांच्यासारखे डोळे वटारून पाहू या ना, विचार करू या ना!

(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)
Original Story

No comments:

Post a Comment