Saturday, February 15, 2014

नाशिकमध्ये आजपासून अनोखा पक्षी महोत्सव

१५ व १६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या महोत्सवात गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम

मोठय़ा संख्येने स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन होणारे तामीळनाडूतील पॉईंट कॅलिमर, कर्नाटकातील रंगनथिट्टू पक्षी उभयारण्य, भारतातील अतिशय दुर्मिळ होत चाललेला माळठोक पक्षी, नाशिक शहर परिसरात तसेच गुजरातमधील कच्छच्या रणातील स्थलांतरीत पक्षी.. अशा वेगवेगळ्या विषयांवर माहितीपटाद्वारे प्रकाशझोत टाकणारा अनोखा 'बर्ड फेस्ट' अर्थात पक्षी महोत्सव नाशिकमध्ये रंगणार आहे. १५ व १६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या महोत्सवात गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रमही होणार आहे.

पक्षी निरीक्षणाचा छंद अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शहरात प्रथमच आयोजित पक्षी महोत्सव पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारक येथे होणाऱ्या या दोन दिवसीय महोत्सवात आंतरराष्ट्रीय माहितीपट दिग्दर्शक बेदी बंधू, शेकर दत्तात्री, असीमा नरेन, विलास काणे यांनी तयार केलेल्या पक्ष्यांवर आधारीत माहितीपट सादर केले जाणार आहेत. नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ व नाशिक वन विभाग यांच्यातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तरेकडून श्रीलंकेकडे स्थलांतरीत होणाऱ्या पक्ष्यांचा तामीळनाडू येथील पॉइंट कॅलिमर हा जणू थांबा आहे. दरवर्षी या ठिकाणी मोठय़ा संख्येने परदेशी पक्षी येतात. या पक्ष्यांवर प्रकाश टाकणारा माहितीपट 'पॉइंट कॅलिमर' सादर होईल. रुंद्रांश माथूर या तेरा वर्षीय मुलाने बनविलेला 'माझ्या खिडकीतून दिसणारे पक्षी' यावर आधारीत पुरस्कार मिळविणारा माहितीपट पाहण्याची संधी महोत्सवात मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर व गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी मोठय़ा संख्येने परदेशी पक्षी येत असतात. त्यावर डॉ. श्रीश क्षीरसागर हे 'स्लाईड शो'द्वारे प्रकाशझोत टाकणार आहेत. गुजरातमधील कच्छचे रण हा काही महिने वाळवंटी असणारा प्रदेश. तथापि, या क्षेत्रात मोठय़ा संख्येने पक्षी येतात. नाशिक व गुजरातमध्ये येणारे स्थलांतरीत पक्षी या विषयावर तज्ज्ञांची व्याख्यानेही होतील. महोत्सवाचा समारोप उत्तर-पूर्व भागात होणाऱ्या पक्षी व प्राण्यांची शिकार या विषयावरील पांडा पुरस्कारप्राप्त 'द वाईल्ड मीट ट्रायल' या रिटा बॅनर्जी दिग्दर्शीत माहितीपटाने होईल. रविवारी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळी साडे सहा ते आठ या कालावधीत पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम होईल.

No comments:

Post a Comment