शशिकांत कोठेकर
मुंबई, पुण्याकडील हरित क्षेत्र वाढत्या शहरीकरणामुळे कमी होत असताना या परिसरात कीटकांच्या चार नवीन प्रजाती आढळून आल्याने निसर्गप्रेमींत काहीसे उत्साहाचे वातावरण आले आहे.
ठाण्यातील येऊरचे जंगल, मुरूडचे फणसाड अभयारण्य तसेच पुणे शहर या ठिकाणी हे नवीन कीटक आढळून आले आहेत. रातकिडे प्रकारात मोडणारे हे कीटक असून ते निशाचर आहेत. कीटक अभ्यासक अमोल पटवर्धन यांना डॉ. आर.पी. आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली कीटकांवर संशोधन करीत असताना कीटकांच्या चार प्रजाती नव्याने आढळून आल्या. पोलंडहून प्रकाशित होणाऱ्या ‘जिनस’ या आंतरराष्ट्रीय मॅगझिनमध्ये कीटकांच्या नवीन प्रजातींबद्दल शोधनिबंध प्रकाशित झाल्याने कीटक संशोधनाला वेगळे महत्त्व आले आहे.
येऊर हे ठाणे शहरातील जंगल नैसर्गिक विपुलतेने भरलेले आहे. बिबळ्या, हरणे, विविध सरपटणारे प्राणी, फुले, झाडे यांनी हे जंगल समृद्ध आहे. या जंगलात कीटक, झाडे यांच्या अभ्यासासाठी अमोल पटवर्धन अनेकदा जातात. मातकट रंगाचा साधारणत: १४ मिमी लांबीचा कीटक या जंगलात आढळला. इतर कीटकांपेक्षा हा थोडा वेगळा आढळला. त्याचे आकारमान, पद्धती, रंग यानुसार त्याचे ‘पंक्टोडीनियस इंडिकस’ असे शास्त्रीय नामकरण करण्यात आले. या कीटकाच्या अळ्या मातीत असतात. सहा ते बारा महिने अळी राहते. झाडांच्या मुळावर या कीटकाच्या अळ्यांचे पोषण सुरू असते. त्यांच्या शोषणाने झाड मात्र काही दिवसात मरते. अळीतून कीटक बाहेर आला की, पानावर, दगडांवर, पानाच्या- खोडाच्या मागे दिवसा हे कीटक असतात. रात्री मात्र दिव्यांवर उडत हे कीटक येतात. मायक्रोस्कोपखाली पुणे शहरातही असाच रात्री दिव्यांवर येणारा कीटक आढळला. त्याचे नामकरण पंक्टोडिनियस बायफॉरेस्ट करण्यात आले.
इतर दोन कीटक मुरूडच्या फणसाड येथील जंगल परिसरात संशोधन करताना आढळले. मेट्रिअॅलीकस बायकलर व एक्सान्थोपेन्थस तांडेली हे दोन कीटक मुरूडच्या जंगलात आढळले. मेट्रिअॅलीकस बायकलर या कीटकाचे पंख तांब्याच्या रंगाचे असतात. काळे डोके आणि पंख तांबूस रंगाचे अशा द्विरंगात असलेला कीटक १४ ते १५ मिमी लांबीचा असतो, तर एक्सान्थोपेन्थस तांडेली हा कीटक पूर्णपणे काळ्या रंगाचा असतो. फणसाडयेथील जंगलात हे दोन्ही कीटक आढळले.
निवृत्त वन अधिकारी सुधीर तांडेल यांनी कीटकांच्या अभ्यासात अमोलला खूप सहकार्य केले. त्यांच्या सन्मानार्थ या काळ्या रंगाच्या नवीन कीटकाच्या नावात शेवटी सुधीर तांडेल यांचे आडनाव जोडून तांडेली नाव करण्यात आले. पोलंड येथून प्रकाशित होणाऱ्या ‘जिनस’ व इतर मॅगझिनमध्ये अमोलचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला.
Tuesday, May 12, 2009
येऊरच्या संपदेत चार नवीन प्रजाती!
Labels:
Amol Patwardhan,
Beetle,
Click-Beetle,
InsectIndia,
Maharashtra,
Marathi,
Thane,
Western Ghats,
Yeur
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment