Tuesday, October 6, 2009

पश्‍चिम घाटात वाढतोय राळ धूप

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, October 06th, 2009 AT 12:10 AM

पुणे - महाराष्ट्राच्या पश्‍चिम घाटातून दुर्मिळ होत असलेल्या वनौषधींचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रकल्प गरवारे महाविद्यालयाच्या बायोडायव्हर्सिटी विभागाचे प्रमुख आणि रानवा संस्थेचे समन्वयक अंकुर पटवर्धन यांनी हाती घेतला आहे. संपूर्ण पश्‍चिम घाटात आढळणाऱ्या 880 वनस्पतींना सर्वाधिक म्हणजे वर्षाला शंभर टनांहून अधिक मागणी आहे. दुर्दैवाने यातील 563 वनस्पतींच्या लागवडींचा अभ्यासच झालेला नाही. राळ धुपाचाही यात समावेश असून, महाराष्ट्रात केवळ पाच पूर्ण वाढ झालेली झाडे शिल्लक आहेत. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात संस्थेला राळ धुपाची वीस रोपे तयार करण्यात यश आले आहे.
या उपक्रमासाठी भानुदास चव्हाण पटवर्धन यांना सहकार्य करीत असून, ब्रिटन येथील रफर्ड फाउंडेशनने यासाठी अर्थसाह्य केले आहे. आंबा घाटात तेथील वनअधिकारी प्रकाश बागेवाडी यांच्या मदतीने नुकतीच राळ धुपाची वीस झाडे लावण्यात आली आहेत. याशिवाय वेल्ह्यात विनयकुमार पुराणिक यांच्या शेतात वावडिंग, सीता अशोक, सप्तरंगी, नरक्‍या, दशमूळ, राळ धूप या झाडांची लागवड केली आहे. नीरेजवळ जेऊर गावातही गणेश धुमाळ यांच्याकडे दीडशे प्रकारच्या वनौषधींची रोपवाटिका आहे.
याबद्दल पटवर्धन म्हणाले, ""राळ धूप या वनस्पतीवर सध्या विशेष लक्ष केंद्रित केले असून यात मिळणाऱ्या नोंदीनुसार पुढे दिशा ठरवली जाईल. धूप ही सदाहरित जंगलात आढळणारी वनस्पती आहे. पश्‍चिम घाटात केवळ पाच पूर्ण वाढ झालेली झाडे शिल्लक आहेत. या झाडाच्या डिंकाचा धुपामध्ये वापर करतात. वर्षाला साधारणतः वीस टन मागणी आहे. त्यामुळे उत्तम प्रतीचे धूप सहसा उपलब्धच होत नाही.
वनौषधी जतन आणि संवर्धन या उपक्रमात सीता अशोक, वावडिंग, नरक्‍या, सप्तरंगी, दशमूळ आणि राळ धूप या दुर्मिळ वनस्पतींची निवड केली असून, त्यांची मानवनिर्मित लागवड, फुटवे, वाढ, पुनर्निर्मिती याचा सविस्तर शास्त्रीय अभ्यास केला जात आहे. वेल्ह्यात लागवड केलेल्या रोपांच्या निरीक्षणाच्या नोंदी घेण्याचे काम सध्या सुरू आहे. याशिवाय आंबा घाटात वीस धुपाची झाडे लावली आहेत, अशी माहिती पटवर्धन यांनी दिली.

Ranwa Webpage

Dr. Ankur Patwardhan's homepage

Story



No comments:

Post a Comment